दक्षिण सोलापूरचा बेदाणा ठरला विक्रमी दराचा ; सर्वाधिक ४०१ दराने झाली बेदाण्याची विक्री
सोलापूर बाजार समितीमध्ये बेदाण्याची ६ कोटीची उलाढाल बाजार समितीमध्ये बेदाण्याच्या दरात वाढ…
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.१५ मार्च
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतीमध्ये बेदाण्याला प्रतिकिलो सरासरी २३० रुपयांचा दर मिळाला. तर बाजारात एकूण ६ कोटी ९६ लाख ९० हजारांची उलाढाल झाली. गेल्या तीन सौद्यांपेक्षा यावेळेस आवक वाढलेली असतानाही त्या तुलनेत दरात २० रुपयांची वाढ झाली. बेदाण्याला कमीत कमी १२० रूपये, कमाल ४०१ व सर्वसाधारण २३० हा दर मिळाला आहे. विशेष म्हणजे दक्षिण सोलापूर तालुक्यातील शिरपनहळ्ळी या गावातील शेतकरी लक्ष्मण बसलिंगाप्पा बिराजदार यांचा बेदाणा सर्वाधिक दराने विक्री झाला आहे.
दरम्यान, सोलापुरातील बाजार समितीत २० फेब्रुवारीपासून सौद्याला सुरवात झाली आहे, पहिल्याच दिवशी प्रतिकिलो सरासरी १६० रुपये दर मिळाला. गेल्या तीन वर्षांत न मिळालेला अपेक्षित दर, त्यामुळे घटलेल्या बागा, यंदा कमी उत्पादन व कच्चा माल (द्राक्ष) विक्रीमुळे बेदाणा उत्पादनात घट झाली आहे. परिणामी यंदा बेदाणा भाव खाण्याची शक्यता असल्याचेच बाजारातील स्थितीवरून दिसत आहे. पहिल्या दोन सौद्यांत आवक कमी होती. प्रतिकिलो सरासरी १५० ते १६० रुपये दर मिळाला होता. मागील गुरुवार (ता. ७) पासून आवक दुपटीने वाढली. आधीच्या सौद्याच्या तुलनेत प्रतिकिलो सरासरी दरातही ६० रुपयांची वाढ झाली. यावेळेस ५०० टनाहून अधिक आवक झाली असतानाही प्रतिकिलो सरासरी २३० रुपयांचा दर मिळाला. मागणीच्या तुलनेत बेदाण्याची आवक कमी असल्याने दरात वाढ झाल्याचे आडत व्यापाऱ्यांनी सांगितले.
यंदा जिल्ह्यातील द्राक्षाचे उत्पादन घटले आहे. अनेक शेतकऱ्यांनी द्राक्षाची बागा कमी केल्या आहेत. त्यामुळे बाजारात सध्या जसे द्राक्षाला चांगला दर मिळत आहे. तसच बेदाण्यालाही चांगला दर मिळत आहे. सोलापूर बाजार समितीमध्ये बेदाण्याच्या जवळपास ५०५ टन आवक येत आहे. सध्या बाजारात बेदाण्याचा चांगला दर मिळत आहे. सांगली, सातारा आणि तासगाव येथील बेदाणा खरेदीदारांकडून बेदाण्याला चांगली मागणी होत आहे. शेतकऱ्यांनाही चार पैसे मिळत असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.
३०३ टन मालाची विक्री, किमान १२० रुपये दर
गुरुवारी एकूण ५०५ टन बेदाण्याची आवक झाली. त्यापैकी ३०३ टन मालाची विक्री झाली. तर २०२ टन बेदाणा विकला गेला नाही. प्रतिकिलो किमान १२० रुपये तर सरासरी २३० रुपये दराने बेदाणा विकला गेला. यातून एकूण ६ कोटी ९६ लाख ९० हजार रुपयांची उलाढाल झाल्याचे बाजार समितीने सांगितले.
सर्वाधिक ४०१ रुपये दर
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत एकूण ९३ बॉक्स म्हणजे १ हजार ३९५ किलो बेदाणा विक्रीसाठी आणला होता. त्या संपूर्ण मालास प्रतिकिलो सर्वाधिक ४०१ रुपये दर मिळाला. तर त्यांचेच ७५ बॉक्स म्हणजे १ हजार १२५ किलो मालास प्रतिकिलो ३५० रुपये दराने विकला गेला. त्यांचा बेदाणा लंबगोल आकाराचा होता. यापुढील काळात देखील भाव वाढ मिळेल अशी अपेक्षा आहे.
– लक्ष्मण बिराजदार, बेदाणा उत्पादक शेतकरी.
आवक (टनामध्ये) व प्रतिकिलो सरासरी दर
दिनांक आवक दर
२० फेब्रुवारी ९७ १६०
२७ फेब्रुवारी २५० १५०
६ मार्च ४८९ २१०
१३ मार्च ५०५ २३०
बेदाण्याला चांगला दर
सोलापूर शहर जिल्ह्यात बेदाण्यास मागणी आहे. मात्र, त्या तुलनेत आवक कमी आहे. त्यामुळे त्याच्या दरात वाढ झाली आहे. यंदा उत्पादनात घट झाल्याने येत्या काळात बेदाण्याला चांगला दर राहणार आहे.
– अरुण बिराजदार, आडत व्यापारी बाजार समिती, सोलापूर