बाजार समितीच्या मतदान प्रक्रियेसाठी १४० कर्मचाऱ्यांची नियुक्ती !
अनुचित प्रकार रोखण्यासाठी ग्रामीण व शहरी भागात पोलीस बंदोबस्त – निवडणूक निर्णय अधिकारी किरण गायकवाड यांची माहिती
शनिवारी सकाळी थंडावणार बाजार समितीच्या प्रचार तोफ
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.२४ एप्रिल
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. सत्ताधारी व विरोधी अशा दोन्ही पॅनलमधील नेते मतदारांची थेट भेट घेत जोरदार प्रचार करत आहेत. सकाळी ६:०० वाजल्यापासून रात्री १०:०० वाजेपर्यंत मतदारांच्या गाठीभेटी सुरू आहेत. नेतेमंडळींनी बाजार समितीची निवडणूक प्रतिष्ठेची बनवली आहे. त्यामुळे नेते उमेदवार आणि कार्यकर्ते पायाला भिंगरी लावून फिरत आहेत. बाजार समितीच्या प्रचाराच्या तोफा शनिवारी (दि.२६) सकाळी (८:००) वाजता बंद होणार आहेत. त्यानंतर रविवारी मतदान तर सोमवार (दि.२८) एप्रिल रोजी मतमोजणी श्रीसिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या सभागृहात सकाळी (८:००) वाजता सुरू होणार आहे.
दरम्यान, या सर्व निवडणूक प्रक्रियेसाठी जिल्हा उपनिबंधक कार्यालय तथा बाजार समिती निवडणूक निर्णयाधिकारी कार्यालय यांच्यावतीने कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. यासंबंधी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आज संपन्न झाले आहे. त्यानुसार प्रत्येक केंद्रावर केंद्रप्रमुख तसेच सहाय्यक नेमण्यात आले आहेत. त्याच पद्धतीने मतदान केंद्रावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील प्रत्येक मतदान केंद्रावर एक स्त्री एक पुरुष पोलीस असणार आहे. तर शहरी मतदान केंद्र श्री सिद्धेश्वर प्रशाला येथे एक पोलीस अधिकारी तसेच महिला व स्त्री पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी असणार आहेत.
दरम्यान, सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीत सहकारी संस्थेचे सदस्या, ग्रामपंचायत सदस्य, व्यापारी आणि हमालाचे सदस्य व तोलारांना मतदानाचा हक्क आहे. त्यामुळे श्री सिद्धेश्वर शेतकरी विकास पॅनल, श्री सिद्धेश्वर बाजार समिती परिवर्तन पॅनल आणि अपक्ष उमेदवारांकडून थेट मतदारांची भेट घेऊन मतदान करण्याचे आवाहन केले जात आहे. त्यामुळे बाजार समितीची निवडणूक रंगतदार होत चालली आहे.
प्रचाराला अवघे दोन दिवस आणि एक रात्र शिल्लक असल्याने श्री सिद्धेश्वर शेतकरी विकास पॅनलचे मार्गदर्शक आ. सचिन कल्याणशेट्टी, उमेदवार दिलीप माने, सुरेश हसापुरे,राजशेखर शिवदारे, श्रीशैल नरोळे तर विरोधी पॅनलकडून आ. सुभाष देशमुख, आ. विजयकुमार देशमुख, माजी आ. सिद्धाराम म्हेत्रे, बळीराम साठे, बाळासाहेब शेळके आदी नेते मतदारांची भेट घेऊन यंदाच्या निवडणुकीत परिवर्तन करण्याचे आवाहन करत आहेत.
लक्ष्मीदर्शनाकडे मतदारांचे लक्ष
बाजार समिती निवडणुकीच्या प्रचाराला दोन दिवस शिल्लक आहेत. तर मतदान चौथ्या दिवशी म्हणजेच रविवारी (दि. २७) होणार आहे. दोन्ही पॅनलकडून पाच हजारांपासून ५० हजारांपर्यंत लक्ष्मीदर्शन होण्याची आशा आहे. अद्यापही लक्ष्मीदर्शन न झाल्याची चर्चा मतदारांमध्ये होत आहे.
मतदान व मतमोजणी या प्रक्रियेसाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती…
बाजार समितीचे मतदान रविवारी (दि. २७) होणार आहे. मतदानाच्या २४ तास आदी म्हणजेच शनिवारी (दि. २६) सकाळी आठ वाजेपर्यंत उमेदवारांना प्रचार करता येणार आहे. त्यानंतर प्रचार केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. त्याच पद्धतीने प्रचार संपन्न झाल्यानंतर मतदान व मतमोजणीच्या प्रक्रियेसाठी सोलापूर जिल्हा उपनिबंधक कार्यालय तथा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक कार्यालय यांच्यावतीने कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच पोलीस बंदोबस्त देखील मागवण्यात आला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी या नात्याने मतदान व मतमोजणीची तयारी करण्यात आलेली आहे.
किरण गायकवाड, निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सोलापूर.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक प्रक्रियेसाठी कर्मचाऱ्यांचे नियोजन
सोलापूर जिल्हा उपनिबंधक कार्यालय येथील कर्मचारी
स्त्री व पुरुष १२५ कर्मचारी
स्त्री व पुरुष १५ राखीव
एकूण १४० कर्मचारी
ग्रामीण भागातील प्रत्येक मतदान केंद्रासह बुथवर पोलिस संख्या
पुरुष – १
महिला – १
श्री सिद्धेश्वर प्रशाला मतदान केंद्र पोलीस बंदोबस्त
पोलिस अधिकारी – १
पोलिस कर्मचारी
पुरुष – २
महिला – २