बाजार सिमितीच्या निवडणुकीची धामधूम अंतिम टप्प्यात ; शहर व ग्रामीण भागात होणार मतदान
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.२५ एप्रिल
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांच्या 18 जागांसाठी रविवार, 27 एप्रिल रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळेत शहरातील एका व ग्रामीण भागातील सात अशा एकूण आठ मतदान केंद्रांवर मतदान होत असून यासाठी 125 व राखीव 15 असे एकूण 140 कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. या नियुक्त कर्मचार्यांना गुरूवारी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात प्रशिक्षण देण्यात आल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी किरण गायकवाड यांनी दिली.
सोलापूर शहरातील सिद्धेश्वर प्रशाला येथील मतदान केंद्रावर सोसायटी व ग्रामपंचायतीच्या मतदारांची सोय करण्यात आली आहे. या केंद्रास एकरूख, कुमठे, केगांव, खेड, गुळवंची, दहिटणे, देगांव, बाणेगांव, बाळे, भोगांव, मजरेवाडी, शेळगी, सोरेगांव, सोलापूर, हगलूर, हिप्परगे, होनसळ, राळेरास ही गावे जोडली आहेत. याठिकाणी सोसायटीचे 336 तर ग्रामपंचायतीचे 78 इतके मतदार मतदान करणार आहेत.
तिर्हे येथील केंद्राला तिर्हे गावासह बेलाटी, कवठे, कोंडी, डोणगांव, तेलगांव, नंदूर, पाकणी, शिवणी, पाथरी, हिरज ही गावे जोडली आहेत. याठिकाणी सोसायटीचे 247 तर ग्रामपंचायतीचे 117 मतदार मतदान करणार आहेत.
नान्नज येथील केंद्रावर नान्नजसह मार्डी, रानमसले, वडाळा, वांगी, अकोलेकाटी, कळमण, कारंबा, कौठाळी, गावडी दारफळ, नरोटेवाडी, पडसाळी, बीबी दारफळ, साखरेवाडी, भागाईवाडी, सेवालाल नगर या गावातील सोसायटीचे 273 तर ग्रामपंचायतीचे 175 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
निंबर्गी येथील केंद्राला निंबर्गीसह कुसूर, अंत्रोळी, खानापूर, तेलगांव, बाळगी, भंडारकवठे, लवंगी, वडापूर, विंचूर, शंकरनगर, सादेपूर, कंदलगांव, कारकल, गुंजेगांव, माळकवठे ही गावे जोडली आहेत. याठिकाणी सोसायटीचे 231 तर ग्रामपंचायतीचे 151 मतदार मतदान करणार आहेत.
मंद्रुप येथील केंद्रावर मंद्रूपसह चिंचपूर, हत्तरसंग, होनमुर्गी, अकोले मंद्रुप, औज मंद्रुप, औराद, कुडल, कुरघोट, टाकळी, नांदणी, बरूर, बसवनगर, बोळकवठे, मंद्रुप, मनगोळी, येळेगांव, वडकबाळ, वांगी, गावडेवाडी या गावातील सोसायटीच्या 248 तर ग्रामपंचायतीच्या 175 मतदारांची सोय करण्यात आली आहे.
आहेरवाडी येथील केंद्रावर आहेरवाडीसह इंगळगी, कणबस (गं), हत्तूर, हिपळे, होटगी (सा), होटगी स्टेशन, आलेगांव, औज (आ), तिल्हेहाळ, फताटेवाडी, बंकलगी, बोरूळ, मद्रे, राजूर, शिरवळ, संजवाड, सिंदखेड, घोडातांडा येथील सोसायटीचे 231 तर ग्रामपंचायतीचे 170 मतदार मतदान करणार आहेत.
वळसंग येथील केंद्रावर वळसंगसह कर्देहळ्ळी, दिंडूर, हणमगांव, आचेगांव, कुंभारी, तीर्थ, तोगराळी, धोत्री, यत्नाळ, रामपूर, लिंबीचिंचोळी, वडगांव-शिर्पनहळ्ळी, शिंगडगांव येथील सोसायटीचे 174 तर ग्रामपंचायतीचे 146 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
बोरामणी येथील मतदान केंद्राला बोरामणीसह कासेगांव, दर्गनहळ्ळी, दोड्डी, उळे, उळेवाडी, गंगेवाडी, तांदुळवाडी, पिंजारवाडी, बक्षीहिप्परगे, मुळेगांव, मुळेगांव तांडा, मुस्ती, वडजी, वरळेगांव, संगदरी ही गावे जोडली असून या गावातील सोसायटीचे 155 तर ग्रामपंचायतीचे 164 मतदार मतदान करणार आहेत.
व्यापारी मतदारसंघातील 1276 तर हमाल तोलार मतदारसंघातील 1084 मतदारांसाठी सिध्देश्वर प्रशालेतील मतदान केंद्रावरच मतदानाची सोय करण्यात आली आहे.
बाजार समितीसाठी एकूण 5 हजार 431 मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून त्यामध्ये व्यापारी मतदारसंघात 1276, हमाल-तोलार मतदारसंघात 1084, ग्रामपंचायत मतदारसंघात 1176 आणि विविध कार्यकारी सोसायटी मतदारसंघात 1895 मतदारांचा समावेश आहे.
सोलापूर शहरातील सिध्देश्वर प्रशालेतील मतदान केंद्रावर एक पोलीस अधिकारी, दोन पुरुष पोलीस तर दोन महिला पोलीस असे एकूण पाच पोलीस अधिकारी, कर्मचार्यांचा बंदोबस्त राहणार आहे. तसेच ग्रामीण भागातील मतदान केंद्रांवर प्रत्येकी एक पुरूष तर एक महिला पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी राहणार आहेत. मतदान केंद्रांवर गडबड, गोंधळ करणार्यांची गय केली जाणार नसल्याचा इशारा निवडणूक निर्णय अधिकारी किरण गायकवाड यांनी दिला.
सोमवार, 28 एप्रिल रोजी सकाळी आठ वाजता श्री सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याच्या अप्पासाहेब काडादी सांस्कृतिक भवन येथे मतमोजणी करण्यात येणार आहे. रविवारी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर त्याचदिवशी सायंकाळी सर्व मतपेट्या मतमोजणी केंद्रात आणून स्ट्राँगरुममध्ये ठेवण्यात येणार आहेत. रात्रभर याठिकाणी 4 शस्त्रधारी पोलिसांचा जागता पहारा असणार आहे. याशिवाय सीसीटीव्ही कॅमेर्याचीही नजर राहणार आहे. मतमोजणीसाठी 75 कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. साधारण दुपारी 12 वाजेपर्यंत निकाल घोषित केला जाईल, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी किरण गायकवाड यांनी दिली.