भाजप काँग्रेस युती अमान्य ; स्वतःचे उभारणार पॅनल – आ. सुभाष देशमुख यांचे संकेत…
सोलापूर बाजार समिती निवडणुकीत भाजप पक्षांतर्गत पडणार फूट ?
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.१५ एप्रिल
सोलापुरातील राजकीय क्षेत्रात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर आपलाच झेंडा राहावा, यासाठी सत्ताधारी भाजप काँग्रेस पक्षातील नेतेमंडळी पक्षविरहित राजकारण करताना दिसत आहेत. मात्र ही गोष्ट भाजपच्या वरिष्ठ आमदाराला मान्य नसल्याने नाराजीची नकारघंटा ऐकण्यास मिळत आहेत. त्यामुळे भाजप पक्षामध्येच दोन गट निर्माण झाले आहेत का असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित होत आहेत. भाजप आणि काँग्रेसमध्ये झालेली ही युती भाजपचे ज्येष्ठ आमदार सुभाष देशमुख यांना मान्य नाही. त्यांची वाटचाल परस्पर विरोधात पॅनल उभी करण्याकडे सुरू असून त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली.
राज्यात शेतमालाच्या विक्रमी उलाढालीसाठी दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत मोठा राजकीय ट्विस्ट निर्माण झालेला दिसत आहे. भाजपचे आमदार तथा जिल्हाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे नेते दिलीप माने, काँग्रेस नेते सुरेश हसापुरे, काँग्रेस नेते बाळासाहेब शेळके यांच्यासह माजी चेअरमन राजशेखर शिवदारे, माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, अविनाश महागावकर, माजी उप सभापती श्रीशैल नरोळे हे सर्व एकत्रित आले आहेत. सर्वांनी स्वतःचे पॅनल उभा करून निवडणूक लढवण्याचे जाहीर केले असून, आज ते पॅनल जाहीर करणार आहेत. यावेळी आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी आमदार सुभाष देशमुख यांना आपल्या पॅनलमध्ये येण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर आमदार देशमुख यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
दरम्यान, आ.देशमुख म्हणाले, बाजार समितीच्या निवडणुकीसाठी मी चार ते पाच बैठका घेतल्या आहेत. भाजपच्या आमदारांना विश्वासात घेऊन या बैठका झाल्या. परंतु भाजपच्या कोर कमिटीच्या बैठकीत नेमका काय निर्णय झाला? हे मला माहित नाही. भाजप या निवडणुकीत काँग्रेस सोबत जाण्याची भूमिका कोणत्याही कार्यकर्त्याला मान्य नाही. त्यामुळे ही निवडणूक कार्यकर्त्यांची असून प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशानुसार बाजार समितीची निवडणूक लढवण्याचे संकेत त्यांनी दिले.
प्रसार माध्यमातून आवाहन करणे मला मान्य नाही. मी त्यांचा पालक आहे. परंतु ते मला पालक मानतात का , नाही? हे मला माहिती नाही. या शब्दात आमदार देशमुख यांनी आमदार कल्याणशेट्टी यांच्यावर नाराजी व्यक्त केली.तत्पूर्वी सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये आ.सचिन कल्याणशेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक होत आहे. या निवडणुकीनंतर तेच निर्णय घेतील. असे स्पष्ट सांगितले होते. पण आता आमदार देशमुख यांनी देखील बाजार समितीच्या मैदानात उतरण्याचे मन बनवले आहे. त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या विरोधात जाऊन ते पॅनल उभे करण्याचे धाडस करणार का ? असाही प्रश्न आता बाजार समितीच्या राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे.