बापूंनी केला पत्ता ओपन ; बाजार समितीच्या निवडणुकीत दिले ओपन चॅलेंज
जे येतील त्यांना घेऊ, अन् जे नाहीत त्यांच्या विरोधात लढू ; आ.देशमुख यांचा निर्वाळीचा इशारा
मालकांच्या भूमिकेकडे लागल्या सर्वांच्या नजरा..
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.१ एप्रिल
मी भाजपचा कार्यकर्ता आहे. पक्षाच्या कार्यकर्त्याला उमेदवारी मिळावी असा आपला प्रयत्न आहे. बाजार समिती निवडणुकीत जे येतील त्यांना सोबत घेऊन जे येणार नाही त्यांच्या विरोधात लढू, असे आ. सुभाष देशमुख यांनी म्हटले आहे.
महापालिकेत आढावा बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना आ. देशमुख म्हणाले. ते म्हणाले, कोणत्या निवडणुकीचे नेतृत्व कोणी करायचे हा विषय भाजपमध्ये गौण असतो. भाजपाचे कार्यकर्ते जर बाजार समिती निवडणूक लढले तर पक्षाचे काहीही म्हणणे नाही. गेली निवडणूकही आपण एकट्याने आणि भाजपकडूनच लढली होती. गतवेळी पक्षातील लोक विरोधात होतेच. मात्र आपण त्याचा विचार न करता स्वतंत्र निवडणूक लढली. यापूर्वी मी जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूकही एकट्या लढलो, मला माझे मत मिळावे म्हणून लढलो. मी भाजप म्हणूनच लढणार आहे, कोणाशीही तडजोड करणार नाही, जे येतील त्यांना सोबत घेऊ जे येणार नाही त्यांच्या विरोधात लढू अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
मालकांच्या भूमिकेकडे लागले सर्वांचे लक्ष…
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख यांनी जरी बाजार समितीच्या निवडणुकीतून माघार घेण्याचे ठरवले असले तरी त्यांची भूमिका काय असणार आहे. याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत. यापूर्वी त्यांनी माजी आमदार दिलीप माने, दक्षिणेचे सुरेश हसापुरे, यांच्या सोबत पॅनल तयार करून निवडणूक लढवली आणि जिंकली होती. आता मात्र त्यांनी निवडणूकीतून माघार घेतली असली, तरी त्यांचा पाठिंबा कोणाला असणार हा प्रश्न अद्याप गुलदस्तात असल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चेला उधाण आलेले आहे.