सोलापूर जिल्ह्यामध्ये १०१०६ लाभार्थ्यांना ८७० कोटीचे कर्ज वाटप ; कर्जापोटी आत्तापर्यंत ८० कोटीचा व्याज परतावा :- नरेंद्र पाटील ….

मराठा उद्योजकांना व्याज परताव्याचा मोठा आधार – नरेंद्र पाटील..!

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ व लोकमंगल बँकेचा उद्योजक मेळावा उत्साहात संपन्न.

प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर , दि. २१ सप्टेंबर – अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून एक लाख उद्योजक तयार करण्याचे काम पूर्ण झाले आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये १०१०६ लाभार्थ्यांना ८७० कोटीचे कर्ज वाटप केले आहे. याकर्जापोटी आज पर्यंत ८० कोटीचा व्याज परतावा देण्यात आला आहे. उद्योजक एखादा उद्योग उभारत असताना कर्जापेक्षा व्याजाच्या पैशानेच  हैराण होतो. मात्र अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून व्याजाचा परतावा भरला जात असल्यामुळे उद्योजकांना मोठा आधार मिळत असल्याचे मत महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केले.

     लोकमंगल को-ऑपरेटिव्ह बँक व अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने एक लाख उद्योजक स्वप्नपूर्ती अंतर्गत सोलापुरातील हुतात्मा स्मृती मंदिर येथे मराठा उद्योजक मेळाव्याचे आयोजित करण्यात आले होते.  या मेळाव्याला मार्गदर्शन करताना नरेंद्र पाटील हे बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर आमदार सुभाष देशमुख, अखिल भारतीय वारकरी मंडळाचे अध्यक्ष सुधाकर इंगळे महाराज , लक्ष्मण महाराज चव्हाण, दास शेळके ,अमोल शिंदे ,सुनील रसाळे, श्रीकांत डांगे ,दिलीप कोल्हे, तात्या वाघमोडे सोमनाथ राऊत, खंडू राऊत, राम जाधव ,अनंत जाधव व लोकमंगल बँक अधिकारी कर्मचारी आणि मराठा उद्योजक, तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  

           यावेळी बोलताना आमदार सुभाष देशमुख म्हणाले की, मी इथं मार्गदर्शन करण्यासाठी नव्हे तर इथे जमलेल्या मराठा उद्योजकांचे दर्शन घेण्यासाठी आलो आहे आतापर्यंत आपण १२६० उद्योजकांना कर्ज पुरवठा केला आहे भविष्यात हजार नव्हे तर दहा हजार उद्योजकांना कर्ज पुरवठा करण्याची उद्दिष्ट असून सोलापूर जिल्हा हा समृद्ध करण्यासाठी आपला प्रयत्न आहे एका उद्योजकाने किमान दहा उद्योजक निर्माण करून गावच्या गाव समृद्ध करावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. यावेळी यशस्वी उद्योजकांचा सत्कार ही करण्यात आला काही उद्योजकांना १५ लाख रुपये कर्जाच्या वाटपाचे चेकही उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.

       

       यावेळी धर्मराज चटके आणि अर्चना करंजे उद्योजकांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाकडून कर्ज उपलब्ध झाल्यामुळे आपण उद्योजक झाल्याचे मनोगत व्यक्त केले. श्रीकांत डांगे, अमोल शिंदे , दिलीप कोल्हे , सुधाकर इंगळे महाराज , लक्ष्मण चव्हाण महाराज, आनंद जाधव,  आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऐश्वर्या हिबारे यांनी केली तर उपस्थितांचे आभार आनंत जाधव यांनी मानले.

मराठा तरुण उद्योगात पुढे यावा.

मराठा तरुण हा नको त्या ठिकाणी पुढे पुढे येतो मात्र असं न होता मराठा तरुण हा उद्योगांमध्ये पुढे यावा नोकरीचा अट्टाहास न करता नोकरी देण्याचा अट्टाहास त्यांनी धरावा.

– अमोल शिंदे , जिल्हा प्रमुख शिवसेना.

लाडक्या बहिणी पेक्षाही ही योजना चांगली.

राज्यामध्ये सध्या लाडक्या बहीण योजनेची चलती आहे. वास्तविक पाहता लाडक्या बहिणीला महिन्याला दीड हजार म्हणजे वर्षाला १८००० रुपये मिळतात.  लाडक्या भावाने जर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामध्ये पंधरा लाखाचं कर्ज घेतलं तर त्याला साडेचार लाख रुपये व्याज परतावा मिळतो. त्यामुळे लाडक्या बहिणी पेक्षा ही लाडक्या भावाची योजना चांगली आहे.

– आ.सुभाष देशमुख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *