सोलापूर शहरात दि.२७ ते २९ नोव्हेंबर दरम्यान भरगच्च कार्यक्रम निवडणुकीच्या अनुषंगाने होणार बैठका, गाठीभेटी अन् इच्छुकांशी संवाद
सोलापूरचा पिंपरी चिंचवडच्या धर्तीवर विकास करण्याची सामान्य सोलापूरकरांकडून होतेय अपेक्षा
सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.२६ नोव्हेंबर
आगामी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सत्ताधाऱ्यांना शह देण्यासाठी महाविकास आघाडीने आपला आघाडी धर्म पाळण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. तर दुसरीकडे महायुती मधील घटक पक्ष आपापल्या ताकदीवर निवडणूक आजमावत आहेत. युतीमधील तिसरा घटक पक्ष असणारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आपल्या पक्षाची मोट बांधण्यास सुरुवात केली आहे. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाची ताकद वाढण्यासाठी उपसभापती तथा सोलापूर जिल्ह्याचे सहसंपर्क मंत्री अण्णा बनसोडे दि.२७ ते २९ नोव्हेंबर ही तीन दिवस सोलापूर दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात ते स्थानिक पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधून ऊर्जा देणार आहेत. अशी माहिती शहराध्यक्ष संतोष पवार यांनी दिली आहे.

दरम्यान, कृषिमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे संपर्कमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मदतीला उपसभापती अण्णा बनसोडे यांना सोलापूर शहर जिल्ह्याचे सहसंपर्क मंत्री करण्यासंबंधी निवेदन देऊन स्थानिक पदाधिकाऱ्यांनी अजित पवारांना गळ घातली. त्यानुसार अजित पवार यांनी देखील याला मान्यता देत, अण्णा बनसोडे यांची सोलापूर शहर जिल्ह्याच्या सहसंपर्क मंत्रीपदी नियुक्ती दिली. त्यांच्या यानिवडीनंतर प्रथमच ते सोलापूर शहराचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात “सोलापूर नक्कीच पिंपरी चिंचवड करू त्यासाठी जीवाचे रान करू”केवळ तुमची साथ सोबत हवी आहे. अशी ऊर्जा सोलापूरच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना पुण्यात संपन्न झालेल्या एका बैठकीत अण्णा बनसोडे यांनी दिली होती. त्याचा प्रत्यय आता सोलापुरात लवकरच येणार आहे.

दरम्यान, उपसभापती तथा सोलापूरचे सहसंपर्क मंत्री अण्णा बनसोडे हे तीन दिवस सोलापूर शहर जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी सोलापूरचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे अण्णा बनसोडे यांच्या बैठकीसाठी पिंपरी चिंचवडला गेले होते. तेव्हा शहराध्यक्ष संतोष पवार आणि प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी अण्णा बनसोडे यांच्याकडे सोलापूर शहर जिल्ह्याच्या दौऱ्याची मागणी केली होती. त्या मागणीनुसार अण्णा बनसोडे यांनी नोव्हेंबर महिन्यातील शेवटच्या आठवड्यात सोलापूरला येण्याचे मान्य केले आहे. त्यानुसार
ते दि.२७ ते २९ नोव्हेंबर दरम्यान सोलापुरात दाखल होणार आहेत. या कालावधीत त्यांचा सोलापूर शहरात दौरा असणार आहे. विविध भागात दौरे, बैठका, चर्चासत्र घेऊन आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. त्याचवेळी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती देखील होतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने यापूर्वीच देखील स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. त्याच अनुषंगाने पक्षाच्या वतीने प्रत्येक जिल्ह्यात संपर्कमंत्री आणि सहसंपर्कमंत्री या पदाची नियुक्ती करून जबाबदारी सोपवली आहे. त्यानुसार अण्णा बनसोडे यांच्या दौऱ्यानंतर पक्षात आणखीन ऊर्जितावस्था येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे पक्षाच्या अनुषंगाने बनसोडे यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.
इच्छुकांची सुरू झाली मोर्चेबांधणी आणि स्वयं सिद्धता
महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने उपसभापती तथा सहसंपर्क मंत्री अण्णा बनसोडे सोलापूर दौऱ्यावर असल्याचे समजल्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादी मधील इच्छुक तसेच पदाधिकारी कार्यकर्ते जोमाने तयारीला लागले आहेत. इच्छुकांसोबत अण्णा बनसोडे हे संवाद साधणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे इच्छुकांची मोर्चे बांधणी आणि स्वयं सिद्धतेची तयारी सुरू झाली आहे.
अण्णा बनसोडे यांच्या दौऱ्यानंतर वातावरण बदलणार ?
उपसभापती तथा सोलापूरचे सहसंपर्क मंत्री अण्णा बनसोडे हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्याचे आहेत. त्यामुळे त्यांना सोलापूर विषयी आत्मीयता आहे. सोलापूर शहर पिंपरी चिंचवडच्या धरतीवर विकसित व्हावे. अशी त्यांची मनोमन इच्छा आहे. त्यामुळेच त्यांच्या या दौऱ्यानंतर शहरातील वातावरण बदलेल. अण्णा बनसोडे हे पॉझिटिव माईंडसेट घेऊन काम करत असल्याने, सोलापुरात त्यांच्या ऍक्टिव मोडमुळे विकासाची नवे दारे खुले होतील.अशी, आशा पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांना आशा आहे. त्यामुळे त्यांच्या या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
– संतोष पवार, शहराध्यक्ष राष्ट्रीय काँग्रेस पार्टी अजित पवार गट