पारधी समाजाने केला नवनिर्वाचित आमदार कल्याणशेट्टी यांचा सत्कार

पारधी समाजाने केला नवनिर्वाचित आमदार कल्याणशेट्टी यांचा सत्कार  !

कल्याणशेट्टी यांच्या विजयात उचलला महत्त्वाचा वाटा ..

प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर, दि.२४ नोव्हेंबर –

संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या अक्कलकोट विधानसभा निवडणुकीत भाजपच्या सचिन कल्याणशेट्टी यांनी माजी गृहराज्यमंत्री सिद्धराम म्हेत्रे यांचा सलग दुसऱ्यांदा पराभव करत विजय संपादन केला. त्यांच्या या अभूतपूर्व यशाबद्दल तालुक्यात आणि जिल्ह्यात कौतुकांचा वर्षाव होत आहे. त्याचा अनुषंगाने पारधी समाजाच्या वतीने नवनिर्वाचित आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचा सत्कार समारंभ करण्यात आला.

 

दरम्यान अक्कलकोट विधानसभा अधिकृत उमेदवार सचिन कल्याणशेट्टी यांना अक्कलकोट तालुक्यातील आदिवासी पारधी समाजा वतीने जाहीर पाठिंबा दिला होता. सुमारे दहा हजार मताधिक्य मिळवून देण्यासाठी पारधी समाजाने अथक प्रयत्न केले. समाजातील ज्येष्ठांनी अक्कलकोट तालुक्यातील प्रत्येक गावागावात,वाड्या, वस्तीवर जाऊन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना मतदान करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत जनतेने कल्याणशेट्टी यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणले. त्याच अनुषंगाने त्यांचा सत्कार सन्मान करण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते दाखल झाले होते. विजय झाल्याबद्दल पारधी समाजाच्या वतीने आणि भाजपा अनुसूचित जाती जमाती आघाडीच्या वतीने सन्मान केला असल्याचे भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा प्रदेश कार्यकारणी सदस्य तथा नगरसेविका राजश्री चव्हाण यांनी सांगितले.

               यावेळी भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा प्रदेश कार्यकारणी सदस्य तथा नगरसेविका राजश्री चव्हाण, नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेले लिंगराज चव्हाण, रेखा काळे, प्रल्हाद चव्हाण, संतोष चव्हाण, भाजपचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अनिल चव्हाण आदींसह जेष्ठ नागरिकांची उपस्थिती होती.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *