डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना कार्यान्वित
योजनेबाबत श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनात केली जातीय जनजागृती ;
शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेण्याचे कृषी विभागाचे आवाहन
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.२३ डिसेंबर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेच्या अनुदानात शासनाकडून भरघोस वाढ करण्यात आली आहे. या दोन्ही योजनेतून पात्र लाभार्थ्यांना नवीन विहीर खोदण्यासाठी यापूर्वी अडीच लाखाचे अनुदान देण्यात येत होते. आता त्यामध्ये वाढ करण्यात आली आसून, ते अनुदान चार लाख रुपये करण्यात आले आहे. जुनी विहीर दुरुस्तीसाठी यापूर्वी ५० हजाराचे अनुदान देण्यात येत होते. ते आता एक लाख करण्यात आले आहे. यापूर्वी या दोन्ही योजनेतील लाभार्थ्यांना योजनेचा लाभ घेण्यासाठी उत्पन्नाची मर्यादा दीड लाख रुपये, तर दोन विहिरीतील अंतर ५०० फुटापेक्षा जास्त नसावे या दोन्ही अटी शासनाने ३ डिसेंबर रोजी काढलेल्या सुधारित मार्गदर्शक सूचना काढून शिथिल केल्या आहेत.
दरम्यान, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना ही अनुसूचित जमाती ( आदिवासी ) प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी राबविली जाते. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना ही अनुसूचित जाती ( नवबौध्द प्रवर्गातील ) शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येते. या योजनेसाठी महाराष्ट्र शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया निरंतर सुरू राहणार आहे. त्याच प्रमाणे या योजने संबंधी जनजागृती करण्यासाठी श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनात स्टॉल्स उभारले आहेत. त्यामधून प्रदर्शनास भेट देणाऱ्या शेतकऱ्यांना योजनेबाबत माहिती दिली जात आहे. याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.
योजनेसाठी हे शेतकरी पात्र असतील.
– लाभार्थी शेतकरी हा अनुसूचित जमाती, अनुसूचित जाती- नवबौद्ध प्रवर्गातील असणे आवश्यक.
– शेतकऱ्याकडे सक्षम अधिकाऱ्याने दिलेले जात प्रमाणपत्र असणे बंधनकारक.
– शेतकऱ्याच्या नावे जमीन धारणेचा सातबारा दाखला व आठ अ उतारा असणे आवश्यक.
– लाभार्थ्यांचे आधारशी संलग्न बैंक खाते असणे आवश्यक, दारिद्रय रेषेखालील लाभार्थ्यास प्रथम प्राधान्य.
– लाभार्थी शेतकऱ्याकडे किमान ०.४० हेक्टर व कमाल सहा हेक्टर इतकी एकत्रित जमीन असणे आवश्यक.
शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणारे विविध उपक्रम
नवीन सिंचन विहीर, जुनी विहीर दुरुस्ती, शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण, इनवेल बोरिंग, वीज जोडणी आकार, डिझेल विद्युत पंप संच, सोलार पंप, एचडीपीई पीव्हीसी पाईप, सूक्ष्म सिंचन संच, तुषार सिंचन पूरक अनुदान, ठिबक सिंचन पूरक अनुदान, बैल ट्रॅक्टर चलित यंत्रसामग्री, परसबाग, विंधन विहीर.
ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध श्रीसिद्धेश्वर कृषी प्रदर्शनात उभारले स्टॉल
शेतकरी कल्याणाच्या या दोन्ही योजनांसाठी पात्र लाभार्थ्यांनी संपूर्ण कागदपत्रांसह शासनाच्या महाडीबीटी या शासकीय पोर्टलच्या mahadbt.maharashtra.gov. in/farmer/login/login या संकेतस्थळावर अर्ज करावेत. योजनेसंदर्भात काही अडचणी- शंका असल्यास अधिक माहितीसाठी पंचायत समिती स्तरावर तालुका कृषी अधिकारी तर जिल्हा स्तरावर सोलापूर जिल्हा परिषद कृषी विभागाशी संपर्क साधावा. तसेच श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनात या योजने संबंधी जनजागृती करण्यासाठी स्टॉल्स उभारले आहे. येथे शेतकऱ्यांनी या संदर्भात माहिती घ्यावी असे, आवाहन करण्यात येत आहे.
– हरिदास हावळे, कृषी विकास अधिकारी सोलापूर जिल्हा परिषद
जिल्हास्तरावर व तालुका स्तरावरून पात्र शेतकऱ्यांना करणार जनजागृती.
अनुसूचित जाती जमाती व नवबौद्ध घटकातील शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी शासनाच्या वतीने बिरसा मुंडा कृषी क्रांती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन या दोन्ही योजना राबविण्यात येत आहेत. या कल्याणकारी योजनेचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांनी घ्यावा. यासाठी जिल्हास्तरावर व तालुका स्तरावरून पात्र शेतकऱ्यांना प्रबोधन करण्याच्या सूचना जिल्हा कृषी विकास अधिकारी व तालुका कृषी विकास अधिकारी यांना दिल्या आहेत.
– संदीप कोहिनकर, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर तथा निवड समितीचे अध्यक्ष