मृगाच्या सरींनी जिल्ह्यातील बळीराजा सुखावला : खरीप हंगामतील पेरणीला केली सुरुवात

सोलापूर व्हिजन

मृगाच्या सरींनी जिल्ह्यातील बळीराजा सुखावला : खरीप हंगामतील पेरणीला केली सुरुवात

सोलापूर :- सोलापूर जिल्ह्यात मान्सून सुरू झाला असून अक्कलकोट तालुक्यातील बळीराजांची पेरणीसाठी लगबग सुरू झालेली दिसत आहे. जिल्ह्यात खरीप हंगामाच्या सुरावातीपासूनच पावसाने हजेरी लावण्यास सुरवात केली आहे. गेल्या आठवड्यातही अनेक भागात चांगला पाऊस झाला. त्यानंतर आता पाऊसाने विश्रांती घेतली असून भिजलेली जमीन वाफसा घेताच शेतकऱ्यांनी खरीप पिकाची पेरणी सुरु केली आहे.

त्यात प्रामुख्याने सोयाबीन,उडीद,भुईमुग शेंगा,तूर व मूग अश्या कडधान्य पिकांचा समावेश आहे.अक्कलकोट तालुक्यात काही भागात शुक्रवारी हलक्या सरी पडल्या.  त्यानंतर शनिवारी काहीवेळ ऊन पडले आणि नंतर ढगाळ वातावरण तयार झाले. सोलापूर जिल्ह्याचे खरिपाचे क्षेत्र ७९ हजार हेक्टरपर्यंत आहे. परंतु, यंदापासून खरिपाच्या क्षेत्रात वाढ करण्यात आली. यंदाचे उद्दिष्ट २ लाख ३४ हजार हेक्टरपर्यंत घेण्यात आले आहे. त्यात सोयाबीन, तूर, मका याची पेरणी होत आहे. आतापर्यंत पाच टक्कयांपर्यंत पेरणी झाल्याचे कृषि विभागाकडून सांगण्यात आले. विश्रांती घेतलेल्या पावसाने आता पुन्हा सुरवात केल्यास पेरण्यांना आणखी गती मिळणार आहे. दरम्यान हवामान खात्याने यावर्षी चांगला पाऊस होणार आहे. असा अंदाज वर्तविल्याने शेतकरी जमिनीनुसार पिकांची पेरणी करीत आहेत. भारी प्रकारच्या जमिनीमध्ये दीर्घकालीन आणि कमी कालावधीची पिके घेता येतात. त्यामुळे आपल्याला दुबार पीक घेता येते म्हणून यामध्ये मूग, उडीद पिके घेतल्यास रब्बी हंगामात ज्वारीसारखे पिके घेता येतात. तर हलक्या जमिनीमध्ये कारळ, तीळ, मटकी अशा प्रकारची पिके घेतल्यास पाणी कमी लागत असल्याने शेतकरी जमिनीनुसार योग्य त्या पिकांचे नियोजन करीत आहे.

खतांचा तुटवडा;पर्यायी खतांचा केला वापर

चांगला पाऊस पडल्याने आम्ही शेतात बैल द्वारे तूर पेरणीला सुरुवात केली आहे.कृषी विभागाने खते मुबलक उपलब्ध असल्याचे सांगितले मात्र डीएपी चा तुटवडा भासत आहे.आम्हाला डीएपी मिळाले नाही.पर्यायी खतांची व्यवस्था करुन पेरणी करत आहोत.

दिलीप व्हणमाने

शेतकरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *