सोलापूर विमानतळाचे पंतप्रधान मोदींच्याहस्ते झाले उद्घाटन !
सोलापूर स्मार्टसिटीचे उत्तुंग झेपावणार रनवे
प्रतिनिधी | सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि. २९ सप्टेंबर – सोलापूर विमानसेवेचा शुभारंभ म्हणजे सोलापूरच्या विकासाचा रनवे अवकाशात झेपावणार! प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २९ सप्टेंबर रोजी आभासी पद्धतीने या विमानसेवेचा शुभारंभ होत असून सोलापूरसाठी ही ऐतिहासिक घटना ठरली आहे. सोलापूरचा उद्योग आणि सोलापुरातील बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी ही एक पर्वणी ठरली आहे.
फेब्रुवारी २००९ मध्ये तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार हस्ते सोलापुरात सेवेचा शुभारंभ झाला. उद्योगपती विजय मल्ल्या यांची किंगफिशर ही ७२आसनी विमानसेवा काही दिवसातच बंद पडली. पुरेशी प्रवासी क्षमता नाही हे कारण पुढे करून विमानसेवा बंद झाली. परंतु हे कारण खरे नसावे. पण यामुळे सोलापूरच्या विकासाला खीळ बसला. तदनंतर सुमारे १४वर्षाच्या वनवास संपल्यानंतर “सोलापूरच्या विकासाचा रनवे झेपावणार” आहे.
दरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी रविवारी दिनांक २९ सप्टेंबर रोजी नवी दिल्ली मध्ये त्यांच्या हस्ते राज्यातील विकास कामांची हंडी फुटणार आहे. आभासी पद्धतीने मोदी विमान सेवा लोकार्पण करणार आहेत. या विमानसेवेमुळे केवळ ४० ते ४५ मिनिटात सोलापूरकर पुणे शहर गाठतील. एरवी रेल्वे आणि रस्ते मार्गे साडेचार ते पाच तास पुणे गाठण्यास लागतात. तो कालापव्यय आता वाचणार आहे. त्यामुळे उद्योजक, व्यापारी, कारखानदार, सरकारी अधिकारी आणि शिक्षण बौद्धिक क्षमतावान तसेच विद्यार्थी वर्ग यांना दिलासा मिळणार आहे.आता ही विमानसेवा भविष्यात तिरुपती, हैदराबाद, बंगळुरू येथेही देता येणार आहे. त्यामुळे भाविक, उद्योजक, व्यापारी, कारखानदार, आयटी क्षेत्रातील गुणवंत यांना सोलापूरचे आकर्षण वाढणार आहे. परिणामी येथील जमिनींना सोन्याचा भाव मिळणार हे निश्चित. एकाअर्थी सोलापूरच्या विकासाचा रनवे आकाशात झेपावणार आहे.
तिरुपती बालाजी भक्तांची झाली सोय
सोलापूरची विमानसेवा सुरू झाल्यानंतर तिरुपती बालाजी दर्शनास जाणाऱ्या भक्तांची मोठी सोय होणार आहे. सोलापूरवरून तिरुपतीकडे जाणारे भक्त मोठ्या प्रमाणात आहेत. बऱ्याचदा या मंडळींना गुलबर्गा किंवा कोल्हापूर येथून विमानाने तिरुपतीला जावे लागते. परिश्रम, वेळ व पैसा आता वाचणार आहे. सोलापुरातील आयटी क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थी पुणे, हैदराबाद बंगळूर येथे आहेत. या ठिकाणची सर्वाधिक संख्या सोलापूरची आहे असे सांगितले जाते, त्यामुळे आता आयटी उद्योगच येथे येईल याची खात्री दिली जात आहे. येथील तेलगू भाषिक रहिवासी तेलंगणा व आंध्र या भागातून आले आहेत. मायभूमी हैदराबादसाठी त्यांची नित्य वारी असते. सोलापूर – हैदराबाद विमानसेवेमुळे तेलगू भाषिकांना दिलासा मिळणार आहे.
सोलापूर मुंबई, पुणे, नाशिक, संभाजीनगर येथे आता उद्योगांसाठी जमीन मिळणे दुरापास्त झाले आहे. अशा परिस्थितीत अनेक उद्योग सोलापुरात येऊ घालतील. पर्यायाने भविष्यात येथे रोजगाराची गॅरंटी निर्माण होईल. सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितले की, आयटी कंपन्यांंसह डाळिंब क्लस्टरचा विषय आता मार्गी लागेल. येत्या काही महिन्यात सोलापूरमध्ये ४६२कोटींचे प्रकल्प होऊ घातले आहेत. एरवी सोलापूरला नकार देणारे उद्योजक त्यांची पसंती सोलापूरच राहील. विमानसेवेमुळे हे शक्य होईल, असे उद्योजक म्हणतात.