अंतराळात पाठविले ३ उपग्रह ; सोलापूरचे सुपुत्र नीरज गाडी यांचे महत्वाचे योगदान 

अंतराळात पाठविले ३ उपग्रह ; सोलापूरचे सुपुत्र नीरज गाडी यांचे महत्वाचे योगदान…

प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर, दी.२९ जानेवारी

भारतात प्रथमच एका खाजगी कंपनीतर्फे नुकतेच अंतराळात पाठविलेले तीन उपग्रह बनविण्याच्या प्रकल्पात सोलापूरचे सुपुत्र नीरज जनार्दन गाडी यांचे मोठे योगदान आहे. सोलापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणारी ही गोष्ट असून सोलापूरकरांच्यादृष्टीने ही अतिशय अभिमानास्पद अशी बाब आहे.

          दरम्यान, बंगळुरुस्थित ‘पिक्सेल’ या खाजगी कंपनीने हे तीन उपग्रह बनविले आहेत. भारताच्या इतिहासात यापूर्वी पाठविण्यात आलेले उपग्रह हे केंद्र शासनाच्या ‘इस्रो’ या संस्थेमार्फत पाठविण्यात आले होते. पण नुकतेच (दि.१५) जानेवारी रोजी अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथून पाठविण्यात आलेले ३ उपग्रह भारताच्या ‘पिक्सेल’ या खाजगी कंपनीमार्फत पाठविण्यात आले. भारतात खाजगी कंपनीमार्फत उपग्रह पाठविण्याची ही पहिलीच वेळ आहे. ‘पिक्सेल’ कंपनीने अमेरिकेतील प्रख्यात ‘स्पेस एक्स’ या कंपनीद्वारे हे उपग्रह अंतराळात पाठविले. या प्रकल्पाकामी पिक्सेल कंपनीची सुमारे २०० जणांची टीम कार्यरत होती.

             या कंपनीमध्ये प्रॉडक्शन इंजिनिअर या क्रमांक दोनच्या पदावर कार्यरत असलेल्या व मूळचे सोलापूरचे असलेल्या नीरज जनार्दन गाडी यांचे योगदान आहे. याकंपनीचे संस्थापक अवेस अहमद व क्षीतिज खंडेलवाल हे असून सन २०१९ मध्ये या कंपनीची स्थापना करण्यात आली होती. राजस्थानमधील बिट्स, पिलानी येथे  बी. ई. (मेकॅनिकल) तसेच फ्रान्समध्ये एरोस्पेस इंजीनिअरिंग मध्ये एम.एस. केलेले सोलापूरचे सुपुत्र नीरज गाडी हे सन २०२२ रोजी या कंपनीत प्रॉडक्शन इंजिनिअर यापदी रुजू झाले. अवेस अहमद व क्षीतिज खंडेलवाल हे नीरज यांचे बिट्स, पिलानी येथील बॅचमेट आहेत, हे विशेष.

          नीरज हे सोलापुरातील प्रसिद्ध शॉप ॲक्ट कन्सलटंट व अश्विनी सहकारी रुग्णालयाचे माजी संचालक रामचंद्र गाडी यांचे नातू असून युनियन बँकेच्या मुंबई येथील मुख्यालयातील उच्चपदस्थ अधिकारी जनार्दन गाडी यांचे चिरंजीव तर दैनिक ‘तरुण भारत संवाद’चे पत्रकार वेणुगोपाळ गाडी यांचे पुतणे आहेत. पिक्सेल कंपनीत कार्यरत असलेल्या नीरज गाडी यांनी प्रॉडक्शन इंजिनिअर या नात्याने  उपग्रहाविषयी पारंगत असणाऱ्या सुमारे ५० जणांची टीम बनवून त्यांना मार्गदर्शन केले. नंतर उपग्रह तयार करण्याची प्रक्रिया बनवून त्या संपूर्ण प्रक्रियेचे पर्यवेक्षण केले.  उपग्रह बनविल्यावर कॅलिफोर्निया येथे जाऊन स्पेस एक्स या कंपनीच्या रॉकेटशी  उपग्रहांची जुळवाजुळवही केली.

        हे तीनही उपग्रह अंतराळात यशस्वीपणे पाठवण्यात पिक्सेल कंपनीला यश आले, ज्याचे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ या कार्यक्रमात कौतुक व अभिनंदन केले.एकंदर नीरज गाडी यांचे या कामी असलेले योगदान सोलापूरसाठी भूषणावह मानले जात आहे. याबाबत त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

 उपग्रह काढणार पृथ्वीवरील  विविध गोष्टींची छायाचित्रे

पिक्सेल कंपनीने ‘हायपर स्पेक्ट्रल पिक्चर’बाबत इनोव्हेशन केले आहे. ज्याद्वारे उपग्रहामार्फत पृथ्वीवरील सुमारे २०० विविध रंगांची छायाचित्रे टिपता येणार आहे. त्याचा उपयोग करून वृक्ष, पीक, माती, हवा, पाणी, शहरी नियोजन आदींबाबत सूक्ष्म वैज्ञानिक माहिती मिळवता येणार आहे. ‘हायपर स्पेक्ट्रल पिक्चर’च्या माध्यमातून एका छायाचित्रात १०० स्क्वेअर किलोमीटरपर्यंतचा डेटा उपलब्ध होणार आहे, अशी माहिती नीरज गाडी यांनी दिली.

येत्या ६ महिन्यांत आणखीन ३ उपग्रह पाठविणार

पिक्सेल कंपनीच्यावतीने ३ उपग्रह यशस्वीपणे अंतराळात पाठविण्याचे मिशन पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर येत्या ६ महिन्यांत आणखीन ३ उपग्रह अंतराळात पाठविण्याचा या कंपनीचा प्रकल्प आहे. यासंदर्भात कंपनीची टीम मेहनत घेत आहे. हा प्रकल्पदेखील यशस्वी होईल, असा कंपनीला विश्वास आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *