आदिशक्तीच्या उत्सवास प्रारंभ…!
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक शक्तीदेवी मंडळांची मंडप थाटण्याची जय्यत तयारी…

प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर , दि. २३ सप्टेंबर – आदिमाया आदिशक्ती श्रीतुळजाभानी मातेचा शारदीय नवरात्रौत्सव दृष्टीक्षेपात आला आहे. याच नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरात आदिशक्तीच्या उत्सवास प्रारंभ झाला आहे. शहरातील विविध सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळाच्या वतीने भव्यदिव्य असा मंडप उभारण्याचे कामकाज सुरू झाले आहे. हलते देखावे साकारण्यासाठी किमान आठ ते दहा दिवस अगोदरच मंडळाकडून मंडप उभारले जातात. त्याच अनुषंगाने शहरातील विविध सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ तयारीत व्यस्त असलेले दिसत आहेत.
सोलापूर शहरात नवरात्रौत्सवाचा जाज्वल्य इतिहास आहे. अनेक शक्तीदेवी मंडळांकडून पौराणिक आणि धार्मिक कथांवर आधारित हालते देखावे या काळात साकारले जातात. सदरचे देखावे पाहण्यासाठी सोलापूर शहरासह आसपासच्या ग्रामीण भागातील देवीभक्त दाखल होत असतात. त्याच अनुषंगाने शहरातील विविध सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ अनेक महिन्यापासून कार्यरत असतात. विविध शक्तीपूजा मंडळांची वर्षानुवर्षांची परंपरा आजही कायम आहे. बाळीवेस , भवानी पेठ , बलिदान चौक , विश्रांती चौक , कुंभारवेस , कोंतम चौक आदींसह विविध परिसरात शक्तीपूजा मंडळाकडून आकर्षक आणि वैविध्यपूर्ण देखावे साकारले जातात. त्यासाठीच सर्वप्रथम भव्यदिव्य मंडप उभारण्याची सुरुवात केली जात आहे.
नवरात्रौत्सवा निमित्त काढले सर्व प्रकारचे परवाने…
नवरात्रौत्सवा निमित्त नऊ दिवस शक्तिदेवी मंडळाकडून विविध धार्मिक विधी संपन्न केले जातात. त्या अनुषंगाने देखील शक्तीपूजा मंडळांची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. मंडप उभारण्यासाठी लागणारे महापालिका प्रशासनाचे वापर परवाना आणि पोलीस प्रशासनाचे ना हरकत प्रमाणपत्र असे विविध प्रकारचे परवाने काढून घेतल्यानंतर सदरची जय्यत तयारी सुरू केली आहे.
हालते देखावे देवीभक्तांचे ठरणार आकर्षण..
नवरात्रौत्सवा निमित्त शहरात विविध सार्वजनिक शक्तीदेवी मंडळांकडून भव्य असे मंडप थाटण्याची जय्यत तयारी सुरू केली आहे. या मंडळाच्यावतीने नवरात्रौत्सवा काळात विविध हालते देखावे साकारले जातात. सदरचे देखावे भक्तांसाठी आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरतात. गतवर्षी देखावे संस्मरणीय ठरले होते. यंदाच्या वर्षी देखील देखाव्याचे आकर्षण असणार आहे.