लाडक्या बहिणीला येतीय आधार सिडींगची अडचण….
बॅकखाते आधार सिडिंग नसल्याने खात्यावर जमा होईना लाडक्या बहिणीची रक्कम….
सोलापूर व्हिजन
सोलापूर , दि. २४ ऑगस्ट – राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी योजना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लागू झाली. खरी परंतु अनेक महिलांना आधार अपडेटनंतर आता आधार सिडींगचे ग्रहण लागले आहे. लाभार्थी महिलांचे आधारकार्ड बँक खात्याशी सिडींग नसल्याने अनेक महिलांना वेळेवर निधी जमा होत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत.
अंगणवाडी सेविकांना सदर योजनेचे अर्ज भरून घेण्याचे कामकाज देण्यात आले. सेविकांनी सर्व अर्ज विहित नमुन्यात आणि वेळेत नारीशक्ती दूत ॲपद्वारे महिलांची नोंदणी केली. त्यानंतर नवीन वेबसाईट सुरू करून त्याद्वारे अर्ज ऑनलाईन अपलोड केला गेला. अर्जातील त्रुटी आढळल्यानंतर त्यांना त्रुटींची पूर्तता करण्यासाठी मेसेज पाठविण्यात आले. पुन्हा एकदा त्रुटींची पडताळणी करून सदरचे अर्ज अप्रूव्हल करून शासनाद्वारे निधी बॅक खात्यात वर्ग झाले. मात्र यामध्ये ज्या महिलांचे आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न म्हणजेच सिडिंग आहे. त्यांनाच निधी उपलब्ध झाला. मात्र ज्या लाभार्थी महिलांचे आधारकार्ड सिडींग नाही अशांना निधी प्राप्त झाला नाही. त्यामुळे आता लाभार्थी महिला खडबडून जाग्या झाल्या आहेत. लागलीच त्यांनी आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न म्हणजेच सिडींग करण्यासाठी बँकेत दाखल होत आधारकार्ड सिडींग फॉर्म भरण्यासाठी गर्दी करत आहेत..
दरम्यान शासनाने महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि सबलीकरणासाठी राज्यातील असंख्य महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने संबंधित लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा केले. दोन महिन्यांचे तीन हजार रुपयांचा निधी बँक खात्यात वर्ग झाल्याने महिलांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले होते. मात्र ज्या लाभार्थी महिलांचे आधारकार्ड बँक खात्याशी संलग्न म्हणजेच सिडींग झाली नाही. त्यांना अद्याप निधीसाठी वाट पाहावी लागणार आहे. जुलै , ऑगस्ट, आणि सप्टेंबर अशा तीन महिन्याचा साडेचार हजार रुपयांचा निधी संबंधित महिलांना प्राप्त होणार आहे. परंतु त्यासाठी महिलांना आधारकार्ड बँक खात्याशी संलग्न करावे लागणार आहे.
आधार कार्ड सिडींगनंतर महिलांना मिळणार आर्थिक लाभ…
लाडकी बहिण योजना अंतर्गत महिलांना सक्षमीकरणासाठी आणि सबलीकरणासाठी दर महिन्याला दीड हजार रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. राज्य शासनाने या महत्वाकांक्षी योजनेपासून असंख्य महिलांना बँक खात्याशी संलग्न केले आहे. तर उर्वरित महिलांना देखील बँक खात्याच्या प्रवाहात आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. यामुळे अनेक महिलांना आर्थिक लाभ मिळणार आहे.
– अंगणवाडी सेविका.
लाभार्थी महिलांची बँकेत आधारकार्ड सिडींगसाठी गर्दी..
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना अंतर्गत महिलांना निधी वितरीत करण्यात येत आहे. आम्हाला निधी उपलब्ध झाला नाही. आधारकार्ड बँक खात्याशी संलग्न म्हणजेच सिडींग नसल्याचा मेसेज आला. त्यामुळे सिडींगचा अर्ज भरण्यासाठी बँकेत आले. पण बँकेत महिला मोठी गर्दी करत आहेत.
– शांताबाई काळे , लाभार्थी महिला.