आधार अपडेटसाठी लाभार्थी महिला झाल्या अप टू डेट ; शासकीय लाभ घेण्यासाठी विविध आधार केंद्रावर महिलांची बालगोपाळांसह हजेरी….
सोलापूर व्हिजन
सोलापूर दि २० जुलै – सध्या विविध शासकीय योजनांचा पाऊस लाभार्थ्यांवर सुरू आहे. याच पावसाचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांची धावपळ सुरू झालेली दिसत आहे. राज्य सरकार महिलांसाठी तसेच तरुणांसाठी विविध योजना आकर्षक पद्धतीने आणत आहे. याच योजनांचा आपल्याला लाभ मिळावा यासाठी लाभार्थी महिला आणि तरुण सज्ज झाले आहेत.
विविध शासकीय योजना आणि त्यांचा लाभ मिळवून घेण्यासाठी आपली कागदपत्रे अपडेट असणे गरजेचे आहे. त्यामुळे प्रत्येक लाभार्थी महिला आणि तरुण आपले कागदपत्र अपडेट करण्यासाठी स्वतः अप टू डेट झाल्याचे दिसून येत आहे. शहरातील विविध आधार केंद्रांवर चिमुकल्या बालगोपाळांसह महिला आणि युवक युवती आपले आधार तसेच पॅन कार्ड घेऊन आवश्यक ते अपडेट करण्यासाठी दाखल झालेले दिसत आहेत.
दरम्यान शासनाने लाडकी बहीण योजना तसेच लाडका भाऊ ही योजना देखील सुरू केली आहे त्यामुळे या योजनेचा लाभार्थी होण्यासाठी अनेक महिला त्यानंतर आता तरुण गेल्या अनेक दिवसांपासून धडपडत आहेत. आधार मधील जन्मतारीख, नाव, पत्ता, चुकीचे असल्यास ते दुरुस्त करण्यासाठी लाभार्थी आधार केंद्रावर दाखल झाले आहेत. विशेषतः लग्न झालेल्या महिलांच्या बाबतीत याचे मोठे प्रमाण दिसत आहे. लग्न होऊन अनेक वर्ष झाली तरी देखील आधार आणि संबंधित कागदपत्रे अपडेट नसल्याने ते कागदपत्रे पहिल्यांदा अपडेट करून घ्यावे लागणार आहेत, त्यानंतरच योजनेचा अर्ज भरता येणार आहे.
यासाठी महिला आता आग्रही भूमिका घेत आहेत. त्यामुळे शहरातील विविध आधार केंद्र महिलांच्या गर्दीने व्यापून गेले आहेत. सकाळपासूनच महिला ह्या आपल्या बालगोपाळांसह केंद्रावर उपस्थित झाल्या आहेत. शहरातील गांधीनगर परिसरातील दाराशा मनपा प्रसुतीगृह येथे असणाऱ्या आधार केंद्र समोर महिलांची दिवसेंदिवस गर्दी वाढत असलेले दिसत आहे.
आधार अपडेटसाठी आधार केंद्र वाढवण्याची महिलांची मागणी
नावातील , जन्मतारखेतील किंवा पत्त्यातील बदल करण्यासाठी किमान आठ दिवसांचा कालावधी लागतो आहे. त्यानंतर अपडेट झालेले आधार कार्ड लाभार्थ्यांना मिळत आहे. त्यानंतरच योजनेचा अर्ज भरता येणार आहे. ही बाब लक्षात घेऊन अनेक महिलांनी या अगोदरच आधार अपडेटसाठी विविध आधार केंद्रांवर गर्दी केली होती. त्यामुळेच आधार केंद्र वाढवावेत अशी मागणी आता महिलांमधून सुरू झालेली दिसत आहे.
–लाभार्थी , महिला
आधार अपडेट करण्यासाठी केंद्रांची संख्या वाढवली पाहिजे.
शहरातील विविध केंद्रांवर महिलांची दिवसेंदिवस गर्दी वाढत आहे. सर्वर डाऊन असले की आधार अपडेट करण्यासाठी वेळ लागतो. कधी कधी आधार अपडेट होत नाही. त्यामुळे महिलांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आधार अपडेट करण्यासाठी केंद्रांची संख्या वाढवली पाहिजे.
– आधार केंद्र चालक